हैद्राबाद : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात खडीने भरलेल्या भरधाव डंपरने एका आरटीसी बसला धडक दिली. या भीषण धडकेत 20 जणांचा खडीखाली दबून मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस तंदूरहून हैदराबादला जात होती. रविवारी घरी सुट्टी घालवून हैदराबादमधील त्यांच्या महाविद्यालयात परतणारे 70 हून अधिक प्रवासी त्यात होते.
रंगारेड्डीच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेटजवळ एका वेगाने जाणाऱ्या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचा चक्काचुर झाला. डंपरमध्ये भरलेली खडी बसमधील प्रवाशांवर कोसळली गेली त्यामध्ये अनेक गाडले गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकाराबाद-हैदराबाद मार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका ट्रकने आरटीसी बसला धडक दिल्याची घटना घडली. विकाराबादच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत आणि 20 जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या अपघातामुळे हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. चेवेल्ला-विकाराबाद मार्गावर वाहने अडवण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे. पोलिस परिस्थिती नियंत्रित करण्याचा आणि वाहतूक वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती मागितली. त्यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना जखमींना तातडीने हैदराबादला पोहोचवण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. अपघाताची माहिती मिळण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने हैदराबादमध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 9912919545 आणि 9440854433 हे क्रमांक आहेत.
दरम्यान राजेंद्रनगरचे डीसीपी योगेश गौतम म्हणाले की, बसला धडक देताना ट्रक उजव्या लेनमध्ये होता. हा अपघात ट्रक चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना झाला की तो चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता याची आम्हाला पडताळणी करावी लागेल. तेलंगणाचे आयटी आणि उद्योग मंत्री दुडिल्ला श्रीधर बाबू यांनी चेवेल्ला मंडळातील मिर्झागुडाजवळ झालेल्या दु:खद अपघाताबद्दल तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले. माहिती मिळताच, मंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना, पोलिस अधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांनी अपघात कसा झाला आणि जखमींची सद्यस्थिती काय आहे याचा सविस्तर अहवाल मागवला. त्यांनी मदत आणि बचाव कार्याबाबत सूचना दिल्या, अधिकाऱ्यांना विलंब न करता अपघातस्थळी पोहोचून बचाव कार्यांचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करण्याचे निर्देश दिले.